ध्यानयोग
अथ षष्ठोऽध्यायः
श्लोक 1
श्रीभगवानुवाच |
अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः |
स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ||६-१||
अनुवाद
जो पुरुष कर्मफळाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म करतो, तो संन्यासी व योगी होय. आणि केवळ अग्नीचा त्याग करणारा संन्यासी नव्हे; तसेच केवळ क्रियांचा त्याग करणारा योगी नव्हे. ॥ ६-१ ॥
श्लोक 3
आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते |
योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ||६-३||
अनुवाद
योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मननशील पुरुषाला योगाची प्राप्ती होण्यासाठी निष्काम कर्म करणे हाच हेतू सांगितला आहे आणि योगारूढ झाल्यावर त्या योगारूढ पुरुषाचा जो सर्व संकल्पांचा अभाव असतो, तोच कल्याणाला कारण सांगितला आहे. ॥ ६-३ ॥
श्लोक 6
बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः |
अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् ||६-६||
अनुवाद
ज्या जीवात्म्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले, त्या जीवात्म्याचा तर तो स्वतःच मित्र आहे आणि ज्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले नाही, त्याचे तो स्वतःच शत्रूप्रमाणे शत्रुत्व करतो. ॥ ६-६ ॥
श्लोक 7 आणि 8
जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः |
शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ||६-७||
ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः |
युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः ||६-८||
अनुवाद
थंड-उष्ण, सुख-दुःख इत्यादी तसेच मान-अपमान यांमध्ये ज्याच्या अंतःकरणाची वृत्ती पूर्णपणे शांत असते, अशा स्वाधीन आत्मा असलेल्या पुरुषाच्या ज्ञानात सच्चिदानंदघन परमात्मा उत्तमप्रकारे अधिष्ठित असतो; म्हणजेच त्याच्या ज्ञानात परमात्म्याशिवाय दुसरे काही नसतेच. ॥ ६-७ ॥ ज्याचे अंतःकरण ज्ञान-विज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याने इंद्रिये पूर्णपणे जिंकली आहेत आणि ज्याला दगड, माती व सोने समान आहे, तो योगी युक्त म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे, असे म्हटले जाते. ॥ ६-८ ॥
श्लोक 11 आणि 12
शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः |
नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् ||६-११||
तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः |
उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये ||६-१२||
अनुवाद
शुद्ध जमिनीवर क्रमाने दर्भ, मृगाजिन आणि वस्त्र अंथरून तयार केलेले, जे फार उंच नाही व जे फार सखल नाही, असे आपले आसन स्थिर मांडून ॥ ६-११ ॥ त्या आसनावर बसून चित्त व इंद्रिय यांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा. ॥ ६-१२ ॥
श्लोक 13 आणि 14
समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः |
सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् ||६-१३||
प्रशान्तात्मा विगतभीर्ब्रह्मचारिव्रते स्थितः |
मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः ||६-१४||
अनुवाद
शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून स्थिर व्हावे. आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून अन्य दिशांकडे न पाहता ॥ ६-१३ ॥ ब्रह्मचर्यव्रतात राहणाऱ्या निर्भय तसेच अत्यंत शांत अंतःकरण असणाऱ्या सावध योग्याने मन आवरून चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने राहावे. ॥ ६-१४ ॥
श्लोक 20, 21, 22, 23
यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया |
यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ||६-२०||
सुखमात्यन्तिकं यत्तद् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् |
वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ||६-२१||
यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः |
यस्मिन्स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ||६-२२||
तं विद्याद् दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम् |
स निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ||६-२३||
अनुवाद
योगाच्या अभ्यासाने नियमन केलेले चित्त ज्या स्थितीत शांत होते आणि ज्या स्थितीत परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने परमात्म्याचा साक्षात्कार होऊन सच्चिदानंदघन परमात्म्यातच संतुष्ट राहाते ॥ ६-२० ॥ इंद्रियातीत, केवळ शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ग्रहण करता येणारा जो अनंत आनंद आहे, तो ज्या अवस्थेत अनुभवाला येतो आणि ज्या अवस्थेत असलेला हा योगी परमात्म्याच्या स्वरूपापासून मुळीच विचलित होत नाही ॥ ६-२१ ॥ परमात्मप्राप्तिरूप जो लाभ झाल्यामुळे त्याहून अधिक दुसरा कोणताही लाभ तो मानीत नाही; आणि परमात्मप्राप्तिरूप ज्या अवस्थेत असलेला योगी फार मोठ्या दुःखानेही विचलित होत नाही ॥ ६-२२ ॥ जो दुःखरूप संसाराच्या संयोगाने रहित आहे, तसेच ज्याचे नाव योग आहे, तो जाणला पाहिजे. तो योग न कंटाळता अर्थात धैर्य व उत्साह यांनी युक्त चित्ताने निश्चयाने केला पाहिजे. ॥ ६-२३ ॥
श्लोक 24 आणि 25
सङ्कल्पप्रभवान्कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषतः |
मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः ||६-२४||
शनैः शनैरुपरमेद् बुद्ध्या धृतिगृहीतया |
आत्मसंस्थं मनः कृत्वा न किञ्चिदपि चिन्तयेत् ||६-२५||
अनुवाद
संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामना पूर्णपणे टाकून आणि मनानेच इंद्रियसमुदायाला सर्व बाजूंनी पूर्णतया आवरून ॥ ६-२४ ॥ क्रमाक्रमाने अभ्यास करीत उपरत व्हावे; तसेच धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करून दुसऱ्या कशाचाही विचारही करू नये. ॥ ६-२५ ॥
श्लोक 29
सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि |
ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ||६-२९||
अनुवाद
ज्याचा आत्मा सर्वव्यापी अनंत चैतन्यात ऐक्यस्थितिरूप योगाने युक्त असून जो सर्वांना समभावाने पाहणारा आहे, असा योगी आत्मा सर्व सजीवमात्रात स्थित व सजीवमात्र आत्म्यात कल्पिलेले पाहातो. ॥ ६-२९ ॥
श्लोक 30
यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति |
तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ||६-३०||
अनुवाद
जो पुरुष सर्व सजीवांमध्ये सर्वांचा आत्मा असलेल्या मला वासुदेवालाच व्यापक असलेला पाहतो आणि सर्व सजीवांना मज वासुदेवात पाहतो, त्याला मी अदृश्य असत नाही आणि मला तो अदृश्य असत नाही. ॥ ६-३० ॥
श्लोक 31
सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः |
सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ||६-३१||
अनुवाद
जो पुरुष ऐक्यभावाला प्राप्त होऊन सर्व सजीवमात्रात आत्मरूपाने असलेल्या मला सच्चिदानंदघन वासुदेवाला भजतो, तो योगी सर्व प्रकारचे व्यवहार करत असला तरी त्याचे सर्व व्यवहार माझ्यातच होत असतात. ॥ ६-३१ ॥
श्लोक 37
अर्जुन उवाच |
अयतिः श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः |
अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति ||६-३७||
अनुवाद
अर्जुन म्हणाला: हे श्रीकृष्णा, जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे; परंतु संयमी नसल्यामुळे ज्याचे मन अंतकाळी योगापासून विचलित झाले, असा साधक योगसिद्धीला म्हणजे भगवत्साक्षात्काराला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो? ॥ ६-३७ ॥
श्लोक 40
श्रीभगवानुवाच |
पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते |
न हि कल्याणकृत्कश्चिद् दुर्गतिं तात गच्छति ||६-४०||
अनुवाद
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), त्या पुरुषाचा इहलोकातही नाश होत नाही व परलोकातही नाही. कारण बाबा रे, आत्मोद्धारासाठी अर्थात भगवत्प्राप्तीसाठी कर्म करणारा कोणताही पुरुष अधोगतीला जात नाही. ॥ ६-४० ॥
श्लोक 43
तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम् |
यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन ||६-४३||
अनुवाद
तेथे त्या पहिल्या शरीरात संग्रह केलेल्या बुद्धिसंयोगाला म्हणजे समत्वबुद्धिरूप योगाच्या संस्कारांना अनायासे प्राप्त होतो आणि हे कुरुवंशीय अर्जुना, त्याच्या प्रभावाने तो पुन्हा परमात्मप्राप्तिरूप सिद्धीसाठी पूर्वीपेक्षाही अधिक प्रयत्न करतो. ॥ ६-४३ ॥
श्लोक 44
पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः |
जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते ||६-४४||
अनुवाद
तो श्रीमंतांच्या घरात जन्म घेणारा योगभ्रष्ट पराधीन असला तरी त्या पहिल्या जन्मीच्या अभ्यासामुळेच निःसंशयपणे भगवंतांकडे आकर्षिला जातो. तसेच समबुद्धिरूप योगाचा जिज्ञासूदेखील वेदाने सांगितलेल्या सकाम कर्मांच्या फळांना ओलांडून जातो. ॥ ६-४४ ॥
श्लोक 46
तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः |
कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन ||६-४६||
अनुवाद
तपस्वी लोकांपेक्षा योगी श्रेष्ठ आहे. शास्त्रज्ञानी पुरुषांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानला गेला आहे. आणि सकाम कर्मे करणाऱ्या माणसांपेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू योगी हो. ॥ ६-४६ ॥
केवळ वाचनापेक्षा अधिक—
तुमचे स्वतःचे ध्यान व्हिडिओ तयार करा.
पवित्र श्लोकांना जगासोबत शेअर करण्यासाठी सुंदर, सिनेमॅटिक व्हिडिओंमध्ये रूपांतरित करा. तुमची पार्श्वभूमी निवडा, मंत्रोच्चार ऑडिओ जोडा आणि आधुनिक स्वरूपात गीतेचा प्रकाश पसरवा.
या वैशिष्ट्यांसाठी अॅप डाउनलोड करा
- उच्च दर्जाची पार्श्वभूमी कलाकृती
- सिंक केलेले संस्कृत आणि अर्थ मजकूर
- तल्लीन करणारा मंत्रोच्चार आणि संगीत
खोल विसर्जनाचा अनुभव घ्या
नित्य गीतेच्या पूर्ण आवृत्तीसह सिनेमॅटिक आध्यात्मिक प्रवास सुरू करा. उच्च दर्जाचा मंत्रोच्चार, अस्सल अनुवाद आणि तुमच्या हाताच्या तळव्यावर एक शांत ध्यान अभयारण्य.