सांख्ययोग
अथ द्वितीयोअध्यायः
श्लोक 5
गुरूनहत्वा हि महानुभावान्
श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके |
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव
भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् ||२-५||
अनुवाद
म्हणून या महानुभाव गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणेही कल्याणकारक समजतो. कारण गुरुजनांना मारूनही या लोकात रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगच ना भोगावयाचे. ॥ २-५ ॥
श्लोक 6
न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो
यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः |
यानेव हत्वा न जिजीविषामस्-
तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ||२-६||
अनुवाद
युद्ध करणे व न करणे या दोहोंपैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे, हे कळत नाही. किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील, हेही आम्हाला माहीत नाही. आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याचीही इच्छा नाही, तेच आमचे बांधव-धृतराष्ट्रपुत्र- आमच्या विरुद्ध उभे आहेत. ॥ २-६ ॥
श्लोक 7
कार्पण्यदोषोपहतस्वभावः
पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः |
यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे
शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ||२-७||
अनुवाद
करुणाव्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुम्हाला विचारीत आहे की, जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे, ते मला सांगा. कारण मी तुमचा शिष्य आहे. म्हणून तुम्हाला शरण आलेल्या मला उपदेश करा. ॥ २-७ ॥
श्लोक 8
न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्
यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् |
अवाप्य भूमावसपत्नमृद्धं
राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ||२-८||
अनुवाद
कारण, पृथ्वीचे शत्रुरहित व धनधान्यसमृद्ध राज्य मिळाले किंवा देवांचे स्वामित्व जरी मिळाले, तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करू शकेल, असा उपाय मला दिसत नाही. ॥ २-८ ॥
श्लोक 9
सञ्जय उवाच |
एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परन्तप |
न योत्स्य इति गोविन्दमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ||२-९||
अनुवाद
हे परंतपा (अर्थात शत्रुतापन) राजा, निद्रेवर ताबा असणाऱ्या अर्जुनाने अंतर्यामी श्रीकृष्णांना एवढे बोलून मी युद्ध करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला. ॥ २-९ ॥
श्लोक 11
श्रीभगवानुवाच |
अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे |
गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ||२-११||
अनुवाद
हे अर्जुना, तू ज्यांचा शोक करू नये, अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस. परंतु ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी, आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत, त्यांच्यासाठीही विद्वान माणसे शोक करीत नाहीत. ॥ २-११ ॥
श्लोक 20
न जायते म्रियते वा कदाचिन्
नायं भूत्वा भविता वा न भूयः |
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो
न हन्यते हन्यमाने शरीरे ||२-२०||
अनुवाद
हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही; कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा आत्मा मारला जात नाही. ॥ २-२० ॥
श्लोक 29
आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेन-
माश्चर्यवद्वदति तथैव चान्यः |
आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति
श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् ||२-२९||
अनुवाद
एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहातो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्त्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो. तसेच आणखी एखादा अधिकारी पुरुषच याच्याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी कोणी तर ऐकूनही याला जाणत नाहीत. ॥ २-२९ ॥
श्लोक 39
एषा तेऽभिहिता साङ्ख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु |
बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ||२-३९||
अनुवाद
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), हा विचार तुला ज्ञानयोगाच्या संदर्भात सांगितला. आणि आता कर्मयोगाविषयी ऐक, ज्या बुद्धीने युक्त झाला असता कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील. ॥ २-३९ ॥
श्लोक 42, 43, 44
यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः |
वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ||२-४२||
कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् |
क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ||२-४३||
भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् |
व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ||२-४४||
अनुवाद
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जे भोगात रमलेले असतात, कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्यांना आवड आहे, ज्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे, स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही, असे जे सांगतात, ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलत असतात, त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफळ देणारी तसेच भोग व ऐश्वर्य मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते. या भाषेने ज्यांचे अंतःकरण आकृष्ट करून घेतले आहे, जे भोग व ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत, अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्चयी बुद्धी असत नाही. ॥ २-४२, २-४३, २-४४ ॥
श्लोक 45
त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन |
निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ||२-४५||
अनुवाद
हे अर्जुना, वेद वर सांगितल्याप्रमाणे तिन्ही गुणांची कार्ये असणारे भोग आणि त्यांची साधने सांगणारे आहेत. म्हणून तू ते भोग व त्यांच्या साधनांच्या बाबतीत आसक्ती बाळगू नकोस. तसेच सुख-दुःखादी द्वंद्वांनी रहित नित्यवस्तू असणाऱ्या परमात्म्यात स्थित, योगक्षेमाची इच्छा न बाळगणारा आणि अंतःकरणाला ताब्यात ठेवणारा हो. ॥ २-४५ ॥
श्लोक 49
दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनञ्जय |
बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः ||२-४९||
अनुवाद
या समत्वरूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे. म्हणून हे धनंजय अर्जुना, तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध म्हणजे बुद्धियोगाचा आश्रय घे. कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यंत दीन असतात. ॥ २-४९ ॥
श्लोक 50
बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते |
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ||२-५०||
अनुवाद
समबुद्धीचा पुरुष पुण्य व पाप या दोहोंचाही याच जगात त्याग करतो. अर्थात त्यापासून मुक्त असतो. म्हणून तू समत्वरूप योगाला चिकटून राहा. हा समत्वरूप योगच कर्मांतील कौशल्य आहे, म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे. ॥ २-५० ॥
श्लोक 54
अर्जुन उवाच |
स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव |
स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ||२-५४||
अनुवाद
अर्जुने विचारले, हे केशवा, जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे, अशा स्थिरबुद्धी पुरुषाचे लक्षण काय? तो स्थिरबुद्धी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो, आणि कसा चालतो? ॥ २-५४ ॥
श्लोक 55
श्रीभगवानुवाच |
प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् |
आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ||२-५५||
अनुवाद
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहातो, त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते. ॥ २-५५ ॥
श्लोक 56
दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः |
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ||२-५६||
अनुवाद
दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो. ॥ २-५६ ॥
श्लोक 58
यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः |
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ||२-५८||
अनुवाद
कासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून धरते, त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली, असे समजावे. ॥ २-५८ ॥
श्लोक 59
विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः |
रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ||२-५९||
अनुवाद
इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचेही केवळ विषयच दूर होतात; परंतु त्यांच्याविषयीची आवड नाहीशी होत नाही. या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते. ॥ २-५९ ॥
श्लोक 61
तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः |
वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ||२-६१||
अनुवाद
म्हणून साधकाने त्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून, चित्त स्थिर करून, मनाला माझाच आधार देऊन ध्यानास बसावे. कारण इंद्रिये ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात, त्याची बुद्धी स्थिर होते. ॥ २-६१ ॥
श्लोक 62 आणि 63
ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते |
सङ्गात्सञ्जायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ||२-६२||
क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः |
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ||२-६३||
अनुवाद
विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाल्या नाहीत की क्रोध म्हणजे राग येतो. ॥ २-६२ ॥ रागामुळे अत्यंत मूढता येते अर्थात अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो. आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधःपात होतो. ॥ २-६३ ॥
श्लोक 65
प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते |
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ||२-६५||
अनुवाद
अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात. आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोग्याची बुद्धी तत्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते. ॥ २-६५ ॥
श्लोक 66
नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना |
न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम् ||२-६६||
अनुवाद
मन आणि इंद्रिये न जिंकणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते आणि अशा अयुक्त मनुष्याच्या अंतःकरणात आस्तिक भावही नसतो. तसेच भावशून्य माणसाला शांती मिळत नाही. मग शांती नसलेल्या माणसाला सुख कोठून मिळणार? ॥ २-६६ ॥
श्लोक 67
इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते |
तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ||२-६७||
अनुवाद
कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो, त्याचप्रमाणे विषयात वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियाबरोबर राहते, ते एकच इंद्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते ॥ २-६७ ॥
श्लोक 69
या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी |
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ||२-६९||
अनुवाद
सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते, अशा नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागतो आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात, ती परमात्मतत्त्व जाणणाऱ्या मुनीसाठी रात्रीसारखी असते. ॥ २-६९ ॥
श्लोक 70
आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं
समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् |
तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे
स शान्तिमाप्नोति न कामकामी ||२-७०||
अनुवाद
ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी, सर्व बाजूंनी भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करताही सामावून जाते, त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच सामावून जातात, तोच पुरुष परम शांतीला प्राप्त होतो. भोगांची इच्छा करणारा नव्हे. ॥ २-७० ॥
श्लोक 72
एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति |
स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ||२-७२||
अनुवाद
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे. ही प्राप्त झाल्याने योगी कधीही मोहित होत नाही. आणि अंतकाळीही या ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन ब्रह्मानंद मिळवितो. ॥ २-७२ ॥
केवळ वाचनापेक्षा अधिक—
तुमचे स्वतःचे ध्यान व्हिडिओ तयार करा.
पवित्र श्लोकांना जगासोबत शेअर करण्यासाठी सुंदर, सिनेमॅटिक व्हिडिओंमध्ये रूपांतरित करा. तुमची पार्श्वभूमी निवडा, मंत्रोच्चार ऑडिओ जोडा आणि आधुनिक स्वरूपात गीतेचा प्रकाश पसरवा.
या वैशिष्ट्यांसाठी अॅप डाउनलोड करा
- उच्च दर्जाची पार्श्वभूमी कलाकृती
- सिंक केलेले संस्कृत आणि अर्थ मजकूर
- तल्लीन करणारा मंत्रोच्चार आणि संगीत
खोल विसर्जनाचा अनुभव घ्या
नित्य गीतेच्या पूर्ण आवृत्तीसह सिनेमॅटिक आध्यात्मिक प्रवास सुरू करा. उच्च दर्जाचा मंत्रोच्चार, अस्सल अनुवाद आणि तुमच्या हाताच्या तळव्यावर एक शांत ध्यान अभयारण्य.